मोठ्या परताव्याच्या आमिषाने फसवणुकीचा आरोप; राजेश्री तुडयेकरांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल.
मोठ्या परताव्याच्या आमिषाने फसवणुकीचा आरोप; राजेश्री तुडयेकरांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------------
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून रॉयल राज गोल्डन लिमिटेड कंपनीच्या संस्थापिका राजेश्री राजेश तुडयेकर यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुडयेकर या स्वतःला समाजसेविका तसेच मोठ्या कंपनीच्या संस्थापिका म्हणून सादर करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीच्या ‘फॉरेस्ट ट्रेडिंग स्कीम’मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कुमार बाबुलाल निंदाने आणि सुरेश पांडुरंग जाधव यांची फसवणूक केल्याचा आरोप असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तुडयेकर यांनी ‘शौर्याची शौर्यगाथा’ नावाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन बानगुडे पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांतील नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी किंवा आरोपांचीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तुडयेकर सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.
फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून, अशा योजनांमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे : वरील आरोप हे गुन्ह्यातील तक्रार व उपलब्ध माहितीनुसार आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्ती दोषी ठरलेली आहे असे समजता येणार नाही.

No comments: