वर्दीचा सन्मान, देशसेवेचा अभिमान! स्वातंत्र्यदिनानिमित्त जय भीम क्रांती सेनेतर्फे विविध वर्दीधारकांचा सन्मान
वर्दीचा सन्मान, देशसेवेचा अभिमान!स्वातंत्र्यदिनानिमित्त जय भीम क्रांती सेनेतर्फे विविध वर्दीधारकांचा सन्मान
तासगाव | प्रतिनिधी
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजाच्या सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या विविध वर्दीधारकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जय भीम क्रांती सेनेतर्फे ‘वर्दी सन्मान कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. जय भीम क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रशांत भाऊ आवळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
देशसेवा ही केवळ सीमेवर लढणाऱ्या जवानांपुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सेवा बजावणारा प्रत्येक कर्मचारी देशसेवेत योगदान देत असतो. याच भावनेतून पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, रुग्णालयातील नर्स व आरोग्य कर्मचारी, विविध सेवक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
विशेषतः सफाई कामगार नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेत शहर व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करणे ही सामाजिक कृतज्ञतेची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत तासगाव परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत वर्दीधारकांचा प्रत्यक्ष भेट घेऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना अनेक वर्दीधारकांनी आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला तासगावचे युवा नेतृत्व तसेच चिंचणी गावचे ग्रामपंचायत सदस्य विशाल भाऊ जाधव उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जय भीम क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी प्रशांत भाऊ आवळे म्हणाले, “देशाच्या सीमेवर उभा असलेला जवान जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शहराची स्वच्छता राखणारा सफाई कर्मचारी, रुग्णांची सेवा करणारी नर्स, वाहतूक नियंत्रित करणारा ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारीही महत्त्वाचा आहे. देशसेवा ही फक्त सीमेवर होत नाही; ती आपल्या आजूबाजूला रोज घडत असते. त्यामुळे प्रत्येक वर्दीचा सन्मान झाला पाहिजे.”
‘व्यक्ती मोठी नसते, तिचे कर्तव्य मोठे असते’ आणि ‘वर्दीचा सन्मान म्हणजे देशसेवेचा सन्मान’ हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जय भीम क्रांती सेनेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
वर्दीचा सन्मान, देशाचा अभिमान!
कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम!



No comments: