Header Ads

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध हीच महाविद्यालयाची ओळख : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे.

 माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध हीच महाविद्यालयाची ओळख : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे.सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 

~~~~~~~~~~~~~~~~~

मुरगूड    जोतीराम कुंभार.

~~~~~~~~~~~~~~~~~

     माजी विद्यार्थी हे केवळ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नसून, ते संस्थेच्या संस्कारांचे आणि शैक्षणिक परंपरेचे प्रतिनिधी असतात. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध हीच महाविद्यालयाची खरी ओळख असून, त्यांच्या कर्तृत्वातून महाविद्यालयाचा लौकिक अधिक वृद्धिंगत होतो, असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले.

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय अॕल्युमिनी असोसिएशन, मुरगूड यांच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहपूर्ण, आनंदी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी एकत्र आले. या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध नव्याने दृढ झाले.

स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून घेतलेले शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्ये समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणणे, हीच संस्थेसाठी सर्वांत मोठी अभिमानाची बाब आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभव, ज्ञान आणि योगदानाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा.”

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. पी. आर. फराकटे यांनी केले. त्यांनी माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील भावनिक नाते अधोरेखित करत, अशा स्नेहमेळाव्यांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी नव्या कल्पना आणि सहकार्याची दारे खुली होतात, असे सांगितले.

यावेळी माजी विद्यार्थी अजित भराडे, अमृत पाटील, प्रा. रामचंद्र पाटील, डॉ. धनाजी खतकर आणि डॉ. सुखदेव एकल मधुकर भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय आठवणी, शिक्षकांचे लाभलेले मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींची साथ आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमांच्या आठवणी सांगितल्या. आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या डोळ्यांत भावुकता दिसून आली. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख उपस्थित अनिल राऊत, मधुकर भोसले, प्रा. दादासाहेब सरदेसाई आणि लेफ्टनंट विनोद प्रधान यांनी मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. महाविद्यालयाने दिलेले शिक्षण व संस्कार विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देतात आणि त्यामुळे विद्यार्थी कितीही दूर गेला तरी त्याचे महाविद्यालयाशी असलेले नाते कायम राहते, हा भाव त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

“विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडतात; मात्र महाविद्यालय त्यांच्या मनातून कधीच बाहेर पडत नाही,” ही भावना संपूर्ण स्नेहमेळाव्यात प्रकर्षाने जाणवली. स्नेह, आठवणी आणि कृतज्ञतेने भारलेल्या वातावरणात माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी प्रा. दीपक साळुंखे, प्रा. दिगंबर गोरे, प्रा. राकेश माने, विजय मोरबाळे महादेव भोई, सदाशिव गिरी, प्रा. प्रीतम गायकवाड, प्रा. सुशांत पाटील, प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. संदीप मोहिते, प्रा. विनायक माने, प्रा. माधुरी कुदळे, प्रा. अश्विनी गुजर, प्रा. वेदिका मगदूम, प्रा. रेवती खराडे, सतीश खराडे, सुमित जाधव सरीता मगदूम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय हेरवाडे यांनी केले, तर प्रा. गुरुनाथ सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जुन्या आठवणींचा जागर आणि महाविद्यालयाच्या भविष्यासाठी सहकार्याची व्यक्त झालेली भावना यामुळे हा स्नेहमेळावा केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम न राहता महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

No comments:

Powered by Blogger.