भारतीय दलित महासंघाचा कळे-गगनबावडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको.
भारतीय दलित महासंघाचा कळे-गगनबावडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको.
कळे प्रतिनिधी सुनिल मोळे
९८९०९०८०४७.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कळे : कळे-गगनबावडा मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सोमवारी (दि. २४) कळे पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याबाबतचे वृत्त स्थानिक पातळीवरही प्रसिद्ध झाले आहे.
भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी ‘कळे-गगनबावडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा’, ‘अधिकाऱ्यांचा निषेध असो’, अशा घोषणा देण्यात आल्या. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच कळे पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कळे ते गगनबावडा दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्ती व पॅचवर्कसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कळे-गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू असून, यापूर्वीही या रस्त्याच्या खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. पॅचवर्कसाठी निधी उपलब्ध असूनही रस्त्याच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा श्रीकांत कांबळे यांनी दिला. भविष्यात होणाऱ्या अपघातांसाठी संबंधित प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी कळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.
आंदोलनात श्रीकांत कांबळे, गणेश कांबळे, सावळा कांबळे, दयानंद कांबळे, बबलू चौगले, उदय पवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

No comments: