Header Ads

नागठाणे–तारळे रस्त्यावर लाखो खड्डे! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? निष्क्रिय मंत्रिपदांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ; निकृष्ट रस्त्याविरोधात संताप

 नागठाणे–तारळे रस्त्यावर लाखो खड्डे! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?

निष्क्रिय मंत्रिपदांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ; निकृष्ट रस्त्याविरोधात संताप.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 सातारा प्रतिनिधी अमर इंदलकर 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागठाणे : नागठाणे ते तारळे या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर शेकडो नव्हे तर लाखो खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार प्रवास करतात. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता संबंधित विभागाचे या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि त्यानंतर झालेली रस्त्याची वाताहत यामुळे शासनाचा पैसा पाण्यात गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी मंत्रीपदांचा उपयोग होत नसेल, तर ही मंत्रिपदे नेमकी कशासाठी? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केवळ पाहणीचे सोपस्कार न करता प्रत्यक्ष रस्त्याची दुरुस्ती करून दाखवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नागठाणे–तारळे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments:

Powered by Blogger.