“शिक्षकांची सेवा समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम” मंत्री प्रकाश आबिटकर.
“शिक्षकांची सेवा समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम” मंत्री प्रकाश आबिटकर.
-------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-------------------------------------
“शिक्षकांची सेवा ही केवळ नोकरी नसून समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षक आपल्या ज्ञान, संस्कार आणि विचारांतून भावी पिढी घडवित असतो. त्यामुळे शिक्षकांचे समाजनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व सार्वजनिक कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. फरकटे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मंत्री आबिटकर पुढे म्हणाले“विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून त्यांना संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. डॉ. फराकटे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली,” असे गौरवोद्गार मंत्री आबिटकर यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. फराकटे यांनी महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. संस्थेने दिलेले सहकार्य, सहकाऱ्यांचे प्रेम आणि विद्यार्थ्यांनी दिलेला स्नेह हीच आपल्या सेवाकाळातील मोठी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राशी आपले नाते कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी डॉ. फराकटे यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय योगदानाचा गौरव केला. इतिहास विभाग तसेच महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती महाविद्यालयासाठी कायम प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र गुरव, पं स राधानगरीच्या मा सभापती वंदना पाटील, ग्रामसेवक संघटनेचे मा जिल्हाध्यक्ष तुळशीराम मुळीक, नगरसेवक सुनील वाडकर, नगरसेवक अभिजीत खतकर, जि प सदस्य शिरीष देसाई, गडहिंग्लज बाजार समितीचे सभापती धनाजी तोरस्कर, भुदरगड युवा सेना प्रमुख विद्याधर परीट, पं स भुदरगड सदस्या रूपाली कुरळे, सरपंच वंदना कांबळे, नाईट कॉलेज कोल्हापूरचे मा प्राचार्य सुरेश फराकटे, जनता गृहनिर्माण पतसंस्थेचे चेअरमन मारुती मोरे, डॉ. शिवाजी पोवार, डॉ. अमृत मगदूम, प्रा. नितेश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी डॉ. फरकाटे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, डॉ. फरकाटे यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. फराकटे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला गौरवपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय हेरवाडे आणि सुशांत पाटील यांनी केले तर आभार प्रा रामचंद्र पाटील यांनी मानले.

No comments: