पवनचक्क्यांच्या तांबेचोरांचा पर्दाफाश! चार जणांना अटक; ७३ किलो तांबे आणि तवेरा वाहन जप्त
पवनचक्क्यांच्या तांबेचोरांचा पर्दाफाश! चार जणांना अटक; ७३ किलो तांबे आणि तवेरा वाहन जप्त
वावदरे, चाळकेवाडीतील चोरीचे दोन गुन्हे उघड; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.
सातारा | जिल्हा प्रतिनिधी : अमर इंदलकर
पवनचक्क्यांच्या केबलमधील तांब्याच्या तारांवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ७३ किलो तांब्याच्या तारा आणि तवेरा वाहनासह ३ लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे वावदरे आणि चाळकेवाडी परिसरातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
गोपनीय माहितीवरून सापळा; चौघे पोलिसांच्या जाळ्यात!
पवनचक्क्यांच्या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते.
१५ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जकातवाडी हद्दीतील बोगदा ते डबेवाडी रस्त्यावर तवेरा वाहनातून पवनचक्क्यांच्या केबलमधील तांबे विक्रीसाठी आणले जाणार असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून एमएच ११ एके १२३१ क्रमांकाच्या राखाडी रंगाच्या तवेरा वाहनासह चार संशयितांना ताब्यात घेतले.
चौघे संशयित ताब्यात
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
शहाजी नथुराम शिर्के (रा. देशमुखनगर, सातारा)
धीरज भार्गव जाधव (रा. गोल मारुती मंदिराजवळ, सातारा)
अजित विठ्ठल जाधव (रा. घाटेवाडी, ता. पाटण)
धर्मेंद्र गोविंद केरेकर (रा. मंगळवार पेठ, सातारा)
जुलै ते ऑगस्टमधील चोरीचा उलगडा
पोलिसांच्या चौकशीत संशयितांनी जुलै ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत वावदरे आणि चाळकेवाडी परिसरातील पवनचक्क्यांच्या केबल चोरून त्यातील तांब्याच्या तारा काढल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २९५/२०२६ आणि ३१७/२०२६ उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि भारतीय विद्युत अधिनियमाचे कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल आहेत.
प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि भारतीय विद्युत अधिनियमाचे कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments: