Header Ads

जयसिंगपूर पालिकेत ‘सत्ताधाऱ्यांची मनमानी’;विरोधकांचा शूटिंगबॉल स्पर्धेवर बहिष्काराचा इशारा.

 जयसिंगपूर पालिकेत ‘सत्ताधाऱ्यांची मनमानी’;विरोधकांचा शूटिंगबॉल स्पर्धेवर बहिष्काराचा इशारा.

-----------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

-----------------------------------

लोकशाहीला हरताळ, प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातात खेळतेय – शिरोळ तालुका विकास आघाडीचा आरोप.

जयसिंगपूर नगरपालिकेत 

सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हुकूमशाही कारभार सुरू केला असून विरोधी नगरसेवकांना पूर्णपणे डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. या अन्यायकारक व पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या शूटिंगबॉल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याची घोषणा शुक्रवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर म्हणाले, “जनतेकडून कर वसूल केला जातो; मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका ‘पैसे नाहीत’ असे सांगते. असे असताना नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ताधारी गटाला थेट पाच-पाच लाख रुपयांचा निधी स्पर्धेसाठी मंजूर केला जातो. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे.”

नगरसेवक संतोष जाधव यांनी सांगितले, “आमचा विरोध कोणत्याही खेळाच्या स्पर्धेला किंवा विकासकामांना नाही; परंतु प्रशासनाला हाताशी धरून मनमानी निर्णय घेणाऱ्या हुकूमशाही वृत्तीला आहे. लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायचे सोडून सत्ताधाऱ्यांनी पालिका म्हणजे खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागणूक दिली आहे.”

नगरसेवक पंकज गुरव व गंडाप्पा पवार यांनी स्पष्ट केले की, “विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव पद्धतशीरपणे बाजूला सारले जात आहेत. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना केवळ दिखाऊ कार्यक्रमांसाठी कोट्यवधींचा निधी उधळला जात आहे.”

पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर, ज्योतीराम जाधव, आदम मुजावर, सागर माने यांच्यासह शिरोळ तालुका विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

“सत्ताधाऱ्यांनी ही मनमानी थांबवली नाही, तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.