Header Ads

सांगलीत मासिक गुन्हे आढावा बैठक; अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचा कडक इशारा.

 सांगलीत मासिक गुन्हे आढावा बैठक; अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचा कडक इशारा.

सांगली, दि. २६ फेब्रुवारी – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली येथे आज मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली. या बैठकीस संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मागील महिन्यातील दाखल व प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. उघडकीस आलेले गुन्हे, अकस्मात मृत्यू, अर्ज चौकशी यांची सविस्तर माहिती घेऊन प्रलंबित गुन्ह्यांची तातडीने निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गंभीर गुन्ह्यांची उकल व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२ पोलीस अधिकारी व ५६ अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ (गांजा) बाळगणारे व खरेदी-विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा “आदान-प्रदान” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण ४८ आरोपी हजर होते. त्यांची सविस्तर चौकशी करून सध्याचा व्यवसाय, उपजीविकेची साधने, मित्रपरिवार, नातेवाईक व राहत्या पत्त्यांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा आरोपींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. अंमली पदार्थ प्रकरणात पुन्हा सहभाग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध तडीपारी तसेच कठोर कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सर्व उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

रेकॉर्डवरील आरोपींवर यापुढेही कडक निगराणी ठेवून अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

No comments:

Powered by Blogger.