Header Ads

शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करून सामाजिक मुख्य प्रवाहात यावे — अमरसिंह पाटील.

 शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करून सामाजिक मुख्य प्रवाहात यावे — अमरसिंह पाटील.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीविषयक आधुनिक व नवतंत्रज्ञान आत्मसात करून सामाजिक मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी केले. ते शाहूवाडी येथील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेत बोलत होते.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेची सुरुवात शाहीर शामराव खडके यांच्या कृषी विषयक पथनाट्य व पोवाड्याने उत्साहपूर्ण वातावरणात झाली. कार्यक्रमस्थळी बचत गटांच्या विविध कृषी प्रक्रिया उत्पादनांचे तसेच आधुनिक कृषी यांत्रिकी अवजारांचे स्टॉल लावण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, तृणधान्य उत्पादन व पोषणमूल्य याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य अमर खोत, पंचायत समिती सदस्य डॉ. धनश्री पाटील, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, विभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे, कृषी अधिकारी शिवाजी काशीद, कृषी पर्यवेक्षक संदीप शेळके, मंडल कृषी अधिकारी संजय तांदळे, व्ही. व्ही. कोळेकर, ओंकार पवार, सचिन कांबळे, डॉ. एच. आर. निरंकारी, प्रगतशील शेतकरी मिलिंद सबनीस, कृषी शास्त्रज्ञ शांतीकुमार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक ज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा उद्देश यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.