कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत; उपाध्यक्षपदी तानाजी पाटील बिनविरोध.
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत; उपाध्यक्षपदी तानाजी पाटील बिनविरोध.
-------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
-------------------------------------
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता स्थापन झाली होती. मात्र अध्यक्षपद राष्ट्रवादी की भाजप या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय तणाव कायम होता. अखेर सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या पक्षाला अध्यक्षपद देण्याच्या फॉर्मुल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत एकूण ६८ सदस्य असून महायुतीकडे ५१ सदस्यांचे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २० सदस्य, भाजपचे १२ तर जनसुराज्य पक्षाचे ६ सदस्य आहेत.
अध्यक्षपद भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सव्वा-सव्वा वर्षे विभागून देण्याचे आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद कागल तालुक्यात कायम ठेवत सेनापती कापशी येथून निवडून आलेल्या शिल्पा खोत यांना संधी दिली.
दरम्यान, उपाध्यक्षपदी भाजपकडून तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गडमुडशिंगी येथून निवडून आले असून आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक मानले जातात.
महायुतीतील समन्वयातून झालेल्या या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून आगामी काळातील कारभाराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments: