कागलमध्ये भीषण अपघात; ११ वर्षीय मुलाचा मृत्यू.
कागलमध्ये भीषण अपघात; ११ वर्षीय मुलाचा मृत्यू.
------------------------------
हर्षवर्धन आचार्य.
------------------------------
कागल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात भरधाव आयशर टेम्पोच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेमंड चौक ते पट्टणकोडोली रोडवरील बीएसएनएल चौकाजवळ मेटा कास्ट कंपनीसमोर हा अपघात झाला. संदीप विश्वनाथ शेटे हे आपल्या मोटारसायकल (MH09-DH-6583) वरून जात असताना आयशर टेम्पो (MH09-CA-1206) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात अथर्व प्रकाश कानडे (वय ११, रा. बेळगुंद्री, ता. गडहिंग्लज) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच संदीप शेटे (वय ३९) व कुंजल कानडे (वय १४) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी श्रीधर सुरेश शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोवार करत आहेत.

No comments: