Header Ads

स्मृती इंटरप्राईजेस प्रस्तुत राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात उत्साहात संपन्न

 स्मृती इंटरप्राईजेस प्रस्तुत राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात उत्साहात संपन्न.

----------------------

मलकापूर प्रतिनिधी

 रोहित पास्ते: 

--------------------

स्मृती इंटरप्राईजेस प्रस्तुत ‘द ज्वेल वन प्रेझेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी’ या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेची तिसरी फेरी आज कोल्हापुरातील हॉटेल रसिका गार्डन येथे दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत तब्बल ५५ युवती व महिलांनी सहभाग नोंदवत आपले कला-कौशल्य सादर केले.

नवी मुंबई आणि पुण्यानंतर कोल्हापुरात झालेल्या या फेरीला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच विविध वेशभूषा, आकर्षक केशरचना आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणासह सहभागी झालेल्या सौंदर्यवतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंडच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपली बुद्धिमत्ता, कला आणि व्यक्तिमत्त्वाची झलक सादर केली.

या स्पर्धेला अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. सौंदर्य स्पर्धा हे महिलांसाठी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत असून, आत्मविश्वास हे यशाचे मुख्य सूत्र आहे. तसेच महिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कुटुंबीयांकडून मिळणारे पाठबळही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


कार्यक्रमात कोरिओग्राफर आशिमिक कामठे यांच्या लावणी सादरीकरणाने रंगत आणली. यावेळी मुख्य आयोजक आधार शिंदे, स्मृती बोनगे, माजी महापौर स्वाती येवले, माजी नगरसेविका वैशाली डकरे व मेहंदी मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच स्मृती एंटरटेनमेंट अँड पेंटिंग स्टुडिओ प्रस्तुत “जयस्तुतेच...” या उपक्रमाचे पोस्टर मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या स्पर्धेची महाअंतिम फेरी ११ एप्रिल रोजी मुंबई येथे पार पडणार असून, त्यामधून महाराष्ट्रातील अंतिम विजेतीची निवड होणार आहे. या फेरीसाठी परीक्षक म्हणून जयेश पाटील, अश्मिक कांमते, सौम्या नायर आणि सोपान शेडगे यांनी काम पाहिले.

एकूणच, या स्पर्धेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील युवती व महिलांना स्वतःची प्रतिभा सादर करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले आहेत.

No comments:

Powered by Blogger.