सांगरुळ येथे सराफावर हल्ला करून दरोडा; दोन आरोपी अटकेत.
सांगरुळ येथे सराफावर हल्ला करून दरोडा; दोन आरोपी अटकेत.
-----------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे सराफ व्यावसायिकावर हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, दोन मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण 11 लाख 18 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तेजाराम पेराजी माळी (वय 45, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांचे सांगरुळ येथे “लक्ष्मी ज्वेलर्स” नावाचे दुकान आहे. दि. 21 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता दुकान बंद करून ते घरी जात असताना स्मशानभूमीजवळ अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर त्यांना मारहाण करून हातपाय बांधत त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेण्यात आली.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रंकाळा परिसरातील पतौडी घाट येथे सापळा रचून प्रवीण ओबाराम माळी (वय 23) व खुशबू जसराज परमार (वय 30, रा. जालोर, राजस्थान) यांना अटक केली. आरोपींकडून वितळवून तयार केलेली 51 ग्रॅम सोन्याची व 119 ग्रॅम चांदीची लगड, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या बुलेट व अॅक्टिव्हा गाड्या जप्त करण्यात आल्या.
तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी प्रवीण माळी याने आर्थिक अडचणीतून हा गुन्हा रचला होता. त्याने साथीदारांच्या मदतीने दोन महिन्यांपूर्वीच दरोड्याची योजना आखून दुकानाची रेकी केली होती. त्यानुसार 21 मार्च रोजी आरोपींनी पाठलाग करून ही घटना घडवली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.
पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

No comments: