परितेतील ‘हॉटेल स्वागत’चा रौप्यमहोत्सव दिमाखात; ‘आस्वाद-आशीर्वाद’ हॉलचे उद्घाटन, कष्टातून उभी राहिलेली यशोगाथा.
परितेतील ‘हॉटेल स्वागत’चा रौप्यमहोत्सव दिमाखात; ‘आस्वाद-आशीर्वाद’ हॉलचे उद्घाटन, कष्टातून उभी राहिलेली यशोगाथा.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
करवीर तालुक्यातील परिते येथील ‘हॉटेल स्वागत’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ‘हॉटेल आस्वाद’ व ‘आशीर्वाद हॉल’चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवसायाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींसह जिल्हा परिषद सदस्य व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘हॉटेल स्वागत’ची सेवा परंपरा ‘आस्वाद’ व ‘आशीर्वाद’ हॉल पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी दाजीपूर पर्यटन आराखडा राबविण्यात येत असून, जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट सेवा देणारे स्थानिक हॉटेल व्यावसायिक या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी मुसळे बंधूंच्या कष्टमय प्रवासाचा गौरव केला. “परिश्रम, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांवर उभा राहिलेला हा व्यवसाय इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले. समाजातील भोंदू बुवाबाजीच्या वाढत्या प्रवृत्तीवरही त्यांनी भाष्य करत पुरोगामी विचार जपण्याचे आवाहन केले.
विश्वास मुसळे यांनी आपल्या मनोगतात व्यवसायाच्या प्रवासाचा आढावा घेत, सुरुवातीपासून साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “कष्ट, संयम आणि ग्राहकांप्रती प्रामाणिक सेवा हीच आमची ताकद आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात बाबासाहेब देवकर, धोंडीराम नकाते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील,शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, प्रा. जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, दिगंबर मेडसिंगे, केरबाभाऊ पाटील,सरपंच मनोज पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार पाटील, एकनाथ पाटील, सागर धुंदरे, सुनील कारंडे, अजित पाटील,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉटेल व्यवसायातील चिकाटी, प्रामाणिकपणा आणि ग्राहककेंद्रित सेवेमुळे ‘हॉटेल स्वागत’ने उंची गाठत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली असून, नव्या उपक्रमांमुळे या यशाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र या सोहळ्यातून स्पष्ट झाले.

No comments: