Header Ads

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याचा आरोप; दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा

 फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याचा आरोप; दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा.

-------------------

शशिकांत कुंभार.

-------------------

कोल्हापूर : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कोल्हापूर पथकाने केली.

एजाज महंमद शेख (पोलीस शिपाई, ब.नं. १५४१, नेमणूक गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे, रा. करनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि नितेश मारुती कांबळे (पोलीस हेड कॉन्स्टेबल, ब.नं. १७४८, नेमणूक गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जाच्या चौकशीदरम्यान तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिली होती.

तपासात पोलीस शिपाई एजाज शेख यांनी प्रभारी अधिकाऱ्यांचे नाव सांगून तक्रारदाराकडे बेकायदेशीरपणे ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर तडजोडीअंती ही मागणी ४ लाख रुपयांवर आणून पुढील दोन दिवसांत लाच रक्कम आणण्यास सांगितल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे हे उपस्थित राहून लाच मागणीस प्रोत्साहन देत असल्याचेही आढळून आले.

या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न लाचखोर पोलीस करत असल्याचे नागरीकामधून बोलताना आढळून येत आहे 

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७(अ) व १२ नुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर व अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूरच्या पथकाने केली.

दरम्यान, नागरिकांनी लाच मागणी किंवा अपसंपत्तीबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.