Header Ads

करवीर तालुक्यात अफू लागवड प्रकरणाचा पर्दाफाश; एकास अटक

 करवीर तालुक्यात अफू लागवड प्रकरणाचा पर्दाफाश; एकास अटक.

-----------------

शशिकांत कुंभार.

-------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बाचणी गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली आहे. शेतात अफूची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याला करवीर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

करवीर तालुक्यातील बाचणी गावातील सर्जेराव गणपती साळोखे याची बाचणी ते हिरवडे खालसा रस्त्यालगत शेतजमीन आहे. या शेतात त्याने अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड करून आर्थिक फायद्यासाठी अफूची विक्री सुरू केल्याची गुप्त माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या शेतावर छापा टाकला असता अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्जेराव साळोखे याला ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी ३९ किलो ३५० ग्रॅम वजनाची अफूची ओली रोपं, पानं, फुलं आणि बोंडं असा सुमारे १ लाख १८ हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार सुभाष सरवडेकर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अधिक तपास करत आहेत.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्जेराव साळोखे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Powered by Blogger.