Header Ads

मिरज खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद.

 मिरज खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; सहा महिन्यांपासून होता फरार

मिरज : मिरज शहरातील खून प्रकरणातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. महमदशिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे (वय २६, रा. पाटील हौद, ब्राम्हणपुरी, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १११ (२)(अ), १०३ (१), १८९, १९०, ६१ (२) तसेच आर्म अॅक्ट ४, २५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१)(i), ३(१)(ii), ३(२), ३(४), ४ नुसार गुन्हा दाखल आहे.

दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास मिरज येथील वडर गल्ली, मंगळवार पेठ येथील निखिल विलास कलगुटगी यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण १५ आरोपी आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी महमदशिराज ऊर्फ सोहेल आगलावणे हा गुन्हा घडल्यापासून सुमारे सहा महिन्यांपासून फरार होता. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथक मिरज शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी म्हैशाळ रोड उड्डाणपुलाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोहेकॉ अतुल माने, पोना सुशिल मस्के, पोकॉ ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी, शांता कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.