"तहानलेल्या वन्यजीवांसाठी माणुसकीचा झरा; खामुंडीच्या पाणवठ्यात 13 हजार लिटर पाणी"
"तहानलेल्या वन्यजीवांसाठी माणुसकीचा झरा; खामुंडीच्या पाणवठ्यात 13 हजार लिटर पाणी"
खामुंडीत वन्यजीवांसाठी पाण्याचा आधार; पाणवठ्यात 13 हजार लिटर पाणी सोडले.
---------------------------------ओतूर, ता. जुन्नर (प्रतिनिधी) : भीषण उन्हाळ्यामुळे वनक्षेत्रातील पाणवठे आटत असताना खामुंडी येथील वन्यजीवांसाठी माणुसकीचा झरा वाहिला. सामाजिक बांधिलकी जपत खामुंडीच्या वनक्षेत्रातील पाणवठ्यात तब्बल 13 हजार लिटर पाणी सोडण्यात आल्याने तहानलेल्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खामुंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांच्या सहकार्याने तसेच छगन लामखडे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या टँकरद्वारे बुधवारी पाणवठा भरून काढण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही याच पाणवठ्यात तीन टँकर पाणी सोडण्यात आले असून वन्यजीवांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे केला जात आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने हरीण, बिबट्या, रानडुक्कर, मोर आणि इतर वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा वेळी या उपक्रमामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
वन विभागाने या कार्याचे कौतुक करत कैलास बोडके आणि छगन लामखडे यांचे आभार मानले आहेत. उन्हाळ्यात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्तीकडे वळतात आणि संघर्षाच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत पाणवठे भरून काढण्याचे उपक्रम मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे वन विभागाने नमूद केले.
यावेळी ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले आणि वनमजूर किसन केदार उपस्थित होते.

No comments: