महिनाभरात चोरीचा छडा; ओतूर पोलिसांनी 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने परत करून जिंकला नागरिकांचा विश्वास
महिनाभरात चोरीचा छडा; ओतूर पोलिसांनी 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने परत करून जिंकला नागरिकांचा विश्वास.
तपासातील तत्परता आणि गुन्हे उघडकीस आणण्यातील कौशल्याची प्रचिती देत ओतूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे 7 तोळे सोन्याचे दागिने अवघ्या एका महिन्यात शोधून काढत फिर्यादीच्या ताब्यात दिले आहेत. 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेतवड (ता. जुन्नर) येथील तान्हाजी बजाबा कुटे (वय 56) यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक बजाबा कुटे (वय 85) यांच्या पत्नीचे जपून ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ओतूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विविध तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आणि चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज हे दागिने तान्हाजी कुटे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. दीर्घकाळाची चिंता दूर झाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार आणि जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, बाळशीराम भवारी, आशिष जगताप आणि विशाल गोडसे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.
अवघ्या एका महिन्यात चोरीचा उलगडा करून 100 टक्के मुद्देमाल परत मिळवून देणाऱ्या ओतूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

No comments: