Header Ads

बाळूमामांच्या आदमापूर यात्रेत टँकरचालक ठरले 'पाण्याचे देवदूत';

 बाळूमामांच्या आदमापूर यात्रेत टँकरचालक ठरले 'पाण्याचे देवदूत'; दिवस-रात्र राबून मिटवली लाखो भाविकांची तहान!

---------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
----------------------------

श्री क्षेत्र आदमापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या सोमवती अमावास्या यात्रेत लाखो भाविकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. यंदा पावसाळा लांबल्याने आणि कॅनॉलला पुरेसे पाणी नसल्याने यात्रेवर तीव्र पाणीटंचाईचे मोठे संकट घोंघावत होते. मात्र, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत "भाविकांची सेवा हीच खरी बाळूमामांची सेवा" हा ध्यास धरून टँकरचालक आणि मालकांनी दिवस-रात्र एक करत अविरत पाणीपुरवठा केला. टँकरचालकांच्या या अथांग परिश्रमांमुळे लाखो भाविकांची तहान भागली असून, त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून "वाह-वाह" आणि कौतुक होत आहे.

   यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. लाखो भाविकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. ही समस्या ओळखून मुरगुड नगरपालिकेचे फिल्टर हाऊस सक्रिय करण्यात आले. तेथील शुद्ध पाणी भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुरगुड नगरपालिका अग्निशामक दल, डिलिशिया दूध संघाचे टँकर आणि खाजगी टँकर मालक यांनी एकत्र येत कमालीचा समन्वय साधला. तीव्र पाणीटंचाईचे सावट असतानाही, टँकर वेळेवर उपलब्ध करून देणे, पाण्याचे चोख वितरण करणे आणि गर्दीच्या ठिकाणी पाणी पोहोचवणे ही आव्हानात्मक कामगिरी या टीमने लीलया पेलली.

   या ऐतिहासिक गर्दीत कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा सुखाची व्हावी, यासाठी 'पोलीस प्रशासनाने' कायदा व सुव्यवस्था चोख राखली. तसेच भाविकांच्या सुदृढ आरोग्यासाठी 'आरोग्य प्रशासन' २४ तास तत्पर सेवा देत ठाण मांडून होते. देवस्थान समितीचे मार्गदर्शन, प्रशासनाचे नियोजन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे यंदाची आदमापूर यात्रा पाणी नियोजनाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरली आहे.

   "श्री बाळूमामा देवालयाने सोपवलेली पाणी पुरवठ्याची ही गुरुकिल्ली सर्वांनी अत्यंत जबाबदारीने आणि भक्तीभावाने पार पाडली. टँकरचालकांनी दाखवलेले हे सातत्य आणि कष्ट वाखाणण्याजोगे आहेत." — भाविकांमधून उमटलेली उत्स्फूर्त भावना.

   पाणीटंचाईचे संकट परतावून लावत यात्रेकरूंची तहान भागवणाऱ्या या खऱ्या 'जलदूतांचा' सन्मान आदमापूर येथे मोठ्या थाटात करण्यात आला. देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि मुरगुड नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांच्या शुभहस्ते सर्व टँकरचालक, मालक आणि कर्मचाऱ्यांचा 'घोंगडे, श्रीफळ आणि बाळूमामांचा भंडारा' देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. बाळूमामांच्या चरणी सेवा रुजू करण्याचे भाग्य मिळाल्याचा सार्थ अभिमान यावेळी टँकरचालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

यावेळी बाळूमामा देवालयचे विश्वस्त दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील अमोल पाटील टँकर मालक गिरीश पाटील, संग्राम मेंडके अजित तावडे पवन गिरी, संदीप मेंडके, आनंदा गोंधळी, नारायण चौगले दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट देवालयचे पुजारी मुरारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजित कदम यांनी आभार मानले

No comments:

Powered by Blogger.