Header Ads

कळे गावच्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सुवर्ण.

 कळे गावच्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सुवर्ण.

-------------------------------
कळे प्रतिनिधी साईश  मोळे.
--------------------------------
आंध्रप्रदेशमधील मार्टूर येथे दि. 29 मे ते 31 मे 2026 दरम्यान पार पडलेल्या 44 व्या नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियनशिप 2026 - ज्युनियर मुले या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघाचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

महाराष्ट्र संघाच्या या ऐतिहासिक विजयात कळे शूटिंगबॉल क्लब, कळे येथील तीन खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला. संघाचे कर्णधार समर्थ दंताळ, विश्वजीत मिठारी आणि तौकिर जमादार यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या अचूक नेमबाजी आणि सांघिक समन्वयामुळे महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले.

या तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राज्य शूटिंग बॉल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन, असोसिएशनचे सचिव श्री. निखिल प्रवीण शेडगे, कोल्हापूर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव श्री. शिलकुमार राज आणि सहसचिव श्री. विनायक कांबळे सर यांनी विजेत्या महाराष्ट्र ज्युनियर संघाचे अभिनंदन केले आहे.

या खेळाडूंच्या यशामागे कोच श्री. फारुख जमादार सर आणि श्री. शाहरुख खलिफ यांचे मार्गदर्शन तसेच कळे गावातील ज्येष्ठ खेळाडू श्री. जयसिंग प्रभावळे, असिफ जमादार, सतीश जाधव यांची मोलाची मेहनत आहे.कळे गावच्या मातीतील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे नाव उज्वल केल्याने क्रीडा रसिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Powered by Blogger.