सांगलीत रक्तरंजित थरार! 15 वर्षीय मुलाच्या डोळ्यात गोळी झाडून खून
सांगलीत रक्तरंजित थरार! 15 वर्षीय मुलाच्या डोळ्यात गोळी झाडून खून अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीतील घटना; हमाल नेते बाळू बंडगर यांच्या नातवाचा मृत्यू, शहरात खळबळ
---------------------------------सांगली शहरातील अभयनगर परिसर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने हादरला. घरात घुसून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोळ्यात पिस्तुलातून गोळी झाडून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत मुलाचे नाव वेदांत मारुती बंडगर (वय 15) असे असून तो सांगली मार्केट कमिटीचे संचालक व हमाल नेते बाळू बंडगर यांचा नातू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास वेदांत अभयनगर येथील स्टेट बँक कॉलनीतील आपल्या घरात होता. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गडदे हा तीन ते चार साथीदारांसह घरात घुसला. त्यानंतर त्याने जवळील पिस्तुलातून वेदांतच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी थेट वेदांतच्या उजव्या डोळ्यात घुसल्याने तो जागीच कोसळला. जखम गंभीर असल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच संजयनगर पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी एलसीबी व संजयनगर पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बाळू बंडगर यांच्याशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून हा खून घडवून आणला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
या थरारक घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

No comments: