हद्दपार आरोपी तलवारीसह जेरबंद; शाहूपुरी पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनला मोठे यश .
हद्दपार आरोपी तलवारीसह जेरबंद; शाहूपुरी पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनला मोठे यश.
---------------------------------कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार.
--------------------------------
कोल्हापूर, दि. १५ जून : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रविवारी मध्यरात्री राबविण्यात आलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान शाहूपुरी पोलिसांनी हद्दपार आरोपीला तलवारीसह ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार दि. १४ जून रोजी रात्री ११ ते १५ जून पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माकडवाला वसाहत आणि कनाननगर परिसरात सखोल तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर तसेच हद्दपार आरोपींची पडताळणी सुरू असताना माकडवाला वसाहत, कावळा नाका येथील पाण्याच्या टाकीजवळ एक संशयित व्यक्ती तलवारीसारखे घातक हत्यार घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संग्राम दीपक पवार (वय २४, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. संबंधित आरोपी हा हद्दपार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ५, २७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, किरण लोंडे, श्रीराम कन्हेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांकडकी, शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे, विठ्ठल जाधव, अभिजित भोर तसेच शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या डीबी पथकांनी आणि पोलीस मुख्यालयाच्या आरसीपी पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

No comments: