Header Ads

चोर मोकाट, गरीब त्रस्त!" रेशन नोटिसांविरोधात शिवसेना आक्रमक

 चोर मोकाट, गरीब त्रस्त!" रेशन नोटिसांविरोधात शिवसेना आक्रमक.


कोल्हापूर :- सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना पाठविण्यात आलेल्या नोटिसांवरून करवीर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. "चोर मोकाट आणि गरीब त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खऱ्या गरजूंचे रेशन बंद करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा, अन्यथा गावागावातील रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करण्यात येईल," असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला.

करवीर तालुक्यातील अनेक गावांतील अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकेबाबत विविध कारणे नमूद करून नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी कारणे स्पष्ट न केल्यास त्यांचे अन्नधान्य वितरण बंद होऊ शकते, असे या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवला. कंपनीचा संचालक असणे, आयकर विवरणपत्र भरणे किंवा जमीनधारक असणे यासारखे निकष लावून अनेक पात्र लाभार्थ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

राजू यादव म्हणाले, "आयकर विवरणपत्र भरणारा प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असतोच असे नाही. अनेक सामान्य नागरिक बँक कर्जासाठी अथवा छोट्या व्यवसायासाठी आयटी रिटर्न भरतात. त्यामुळे अशा निकषांच्या आधारे रेशन बंद करणे अन्यायकारक आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे अद्याप रेशनकार्डवर नाहीत. लग्न झालेल्या मुली, लहान मुले आणि इतर वंचित घटकांनाही योजनेचा लाभ मिळायला हवा."


उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनीही सरकारवर टीका करताना सांगितले की, "मिशन सुधार राईटफुल टारगेटच्या नावाखाली गोरगरिबांचे रेशन बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना हा डाव यशस्वी होऊ देणार नाही."


यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व पुरवठा अधिकारी विकास देसाई यांना निवेदन देण्यात आले. संबंधित भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवून यावर तातडीने तोडगा काढण्याबाबत त्यांनी आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे, दिनेश परमार, संतोष चौगुले, दत्ता फराकटे, कैलास जाधव, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, किशोर कामरा, मोहन रजपूत, बाबुराव पाटील यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.