Header Ads

तासगाव-विटा परिसरातील मोटारसायकल चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

 तासगाव-विटा परिसरातील मोटारसायकल चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात.

--------------------------
 सांगली मिरज प्रतिनिधी
 राजू कदम.
--------------------------- 

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर यशस्वी कारवाई करत दोन आरोपी व एका बालअपचारीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे तासगाव व विटा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोहेकॉ. सागर टिंगरे व दरिया बंडगर यांना गोपनीय माहिती मिळाली की, तासगाव-गोटेवाडी रोडवरील एम. एम. पार्क परिसरात चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणल्या जाणार आहेत.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ऋतुराज कुमार मंडले (वय १९) व अनिकेत संजय चव्हाण (वय १९, दोघेही रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव) तसेच एका बालअपचारीने मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तासगाव, सावळज, विटा, पळशी आणि हिवरे परिसरातून पाच मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या हिरो स्प्लेंडर कंपनीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या.

तपासात तासगाव पोलीस ठाण्यातील तीन व विटा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून बालअपचारीला नातेवाईकांच्या उपस्थितीत हजर करण्यात आले आहे.

या कारवाईत पोहेकॉ. सागर टिंगरे, दरिया बंडगर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

No comments:

Powered by Blogger.