Header Ads

धारदार कुंचला कायमचा थांबला... ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे निधन; कला विश्वावर शोककळा.

 धारदार कुंचला कायमचा थांबला... ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे निधन; कला विश्वावर शोककळा.

व्यंगचित्रांतून सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय प्रश्नांवर अचूक भाष्य करणाऱ्या संवेदनशील कलाकाराला अखेरचा निरोप.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रा. पी. जे. पाटील | कुडित्रे प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर (फुलेवाडी) : आपल्या धारदार कुंचल्याने समाजातील विसंगतींवर नेमके बोट ठेवणारे, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त चित्रकला शिक्षक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे बुधवार (८ जुलै २०२६) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कला, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून महाराष्ट्राने एक संवेदनशील, अभ्यासू आणि निर्भीड व्यंगचित्रकार गमावला आहे.

शिराज मुजावर सर हे कळे विद्या मंदिर, कळे (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक होते. शिक्षक म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कलेची प्रेरणा दिली, तर व्यंगचित्रकार म्हणून आपल्या प्रभावी रेखाटनांतून सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय आणि नागरी समस्यांवर अचूक भाष्य केले.

रस्त्यांच्या चौकाचौकात बसून त्यांनी काढलेल्या मार्मिक व्यंगचित्रांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या प्रदर्शनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक आणि प्रदर्शनांमधून त्यांची हजारो व्यंगचित्रे प्रकाशित झाली. दैनिक पुढारीच्या 'अंकूर' पुरवणीच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणीत त्यांची व्यंगचित्रे नियमित प्रसिद्ध होत असत.

त्यांनी 'खट्याळ कुंचला', 'मिस्किल गुंडूराव', 'हसा... हसा... हसा' ही व्यंगचित्रांची पुस्तके तसेच 'पूर्ण विराम' आणि 'संदर्भ' हे कवितासंग्रह प्रकाशित केले. त्यांच्या 'चंपक' या कथात्मक व्यंगचित्र मालिकेचे देशातील पाच भाषांमध्ये प्रकाशन झाले होते. चित्रकलेसोबतच गायन, वादन, गीत-संगीत आणि साहित्याचीही त्यांना उत्तम जाण होती. त्यामुळे ते एक बहुआयामी कलावंत म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुरळी हे जन्मगाव, कळे विद्या मंदिरचे हजारो आजी-माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्यभरातील असंख्य कलाप्रेमी असा मोठा परिवार आहे.

शिराज मुजावर सर यांच्या निधनाने केवळ एक व्यंगचित्रकार नव्हे, तर समाजातील प्रश्नांवर कुंचल्यातून बोलणारा निर्भीड आवाज कायमचा हरपला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली!

"कुंचला थांबला... पण समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या तुमच्या रेषा कायम स्मरणात राहतील. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांना विनम्र अभिवादन."

No comments:

Powered by Blogger.