धारदार कुंचला कायमचा थांबला... ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे निधन; कला, साहित्य आणि शैक्षणिक विश्वावर शोककळा.
धारदार कुंचला कायमचा थांबला... ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे निधन; कला, साहित्य आणि शैक्षणिक विश्वावर शोककळा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर (फुलेवाडी) येथील आपल्या कुंजल्याच्या धारधार फटकाऱ्यांनी आणि मार्मिक रेखाटनांनी समाजातील विविध घडामोडीवर, विशेषतः सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कोल्हापूर शहरातील पर्यावरण, प्रदूषण आणि आजची राजकीय स्थिती अशा नागरी समस्यांवर नेमके बोट ठेवणारे कोल्हापूरचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त चित्रकला शिक्षक, सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिराज मुजावर सर यांचे दुःखद निधन बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी झाले आहे. त्यांच्या निधनाने कला व शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. शिराज मुजावर हे कळे विद्या मंदिर, कळे येथील सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक होते.
चित्रकलेबरोबरच त्यांनी व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य जनतेचे प्रश्न मांडले. त्यांना भावलेल्या विविध विषयांवर भाष्य करण्यासाठी त्यांनी रस्त्यांच्या चौकाचौकात बसून विडंबनात्मक व्यंगचित्रे रेखाटली होती, ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. त्यांच्या अनेक प्रदर्शनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सामाजिक अन्यायावर अचूक प्रहार करणारी त्यांची अनेक व्यंगचित्रे विविध नियतकालिके, साप्ताहिके, मासिके, दैनिके, दिवाळी अंक आणि प्रदर्शनामधून प्रसिद्ध झाली होती. तसेच आजपर्यंत हजारो चित्रे प्रकाशित झाली आहेत. नियमितपणे दैनिक पुढारीमधील 'अंकूर' पुरवणीचे मुखपृष्ठ प्रकाशित होत असे; तसेच पुरवणीत त्यांची व्यंगचित्रेही प्रकाशित होत असत.
त्यांच्या व्यंगचित्रांची 'खट्याळ कुंचला', 'मिस्किल गुंडूराव', 'हसा... हसा... हसा' ही पुस्तके तसेच 'पूर्ण विराम' आणि 'संदर्भ' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 'चंपक' या कथात्मक व्यंगचित्रांचा अंक देशातील पाच भाषांतून प्रकाशित होत होता. गायन, वादन, कला तसेच गीत-संगीताची जाण असलेले ते विविध क्षेत्रांतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या निधनाने एका लढवय्या आणि संवेदनशील कलाकाराला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बूर्ली हे जन्मगाव, तसेच कळे विद्या मंदिर, कळे (ता. पन्हाळा) या प्रशालेचे हजारो आजी-माजी विद्यार्थी, क.वि.म. कळे माजी विद्यार्थी संघटना प्रणित श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मरळी, संपूर्ण महाराष्ट्रातील कलाप्रेमी, त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: