'कोविड'चा फायदा घेत चार वर्षे पोलिसांना गुंगारा; खुनातील फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!
'कोविड'चा फायदा घेत चार वर्षे पोलिसांना गुंगारा; खुनातील फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!
------------------------------
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------
शाहूपुरी चौकात सापळा रचून कारवाई; पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी.
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर जाऊन कोविड काळातील सवलतींचा फायदा घेत तब्बल चार वर्षांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. शाहूपुरी चौकात सापळा रचून भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या निर्देशानुसार कारागृहातून पॅरोल अथवा संचित रजेवर जाऊन मुदतीत परत न आलेल्या बंद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने आरोपीचा कसून शोध सुरू केला.
भरत ओसवाल हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना १४ मे २०२० रोजी ४५ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर कोविड काळातील सवलतींचा लाभ घेत त्याने रजा वाढवून घेतली. मात्र, १९ मे २०२२ रोजी कारागृहात हजर राहणे बंधनकारक असतानाही तो परतला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७२ व २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
फरार आरोपी वारंवार वेशांतर करून आणि ठिकाण बदलून राहत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या जुन्या संपर्कांचे विश्लेषण करत गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने त्याचा माग काढला. अखेर १ जुलै २०२६ रोजी तो शाहूपुरी चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

No comments: