Header Ads

कोल्हापुरात बिल्डरला १ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; 'काम बंद करा, नाहीतर परिणाम भोगा'ची धमकी, पाच जणांवर गुन्हा

 कोल्हापुरात बिल्डरला १ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; 'काम बंद करा, नाहीतर परिणाम भोगा'ची धमकी, पाच जणांवर गुन्हा.


कोल्हापूर | प्रतिनिधी.

कोल्हापूर शहरात एका नामांकित बिल्डरकडे तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी अपहरण करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

फिर्यादी निलेश सुरेश जाधव (वय ३२, रा. मोरे माने नगर) हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्या 'सोनी हाईट्स' या गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना आरोपींनी ते बंद पाडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी आरोपींनी फिर्यादीचे जबरदस्तीने अपहरण करून त्यांना गाडीतून कावळा नाका परिसरात नेले. त्यानंतर रुईकर कॉलनीतील एका कार्यालयात कोंडून ठेवत तब्बल १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.

याचबरोबर, फिर्यादी त्यांच्या पत्नीसोबत असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली तसेच "आमच्याशी व्यवहार केल्याशिवाय हे बांधकाम सुरू होणार नाही," असा दम भरत कामगारांनाही कामावरून पळवून लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अजित भगवान तिवडे (रा. रुईकर कॉलनी), फय्याज इसाक नगराजी (रा. साळोखेनगर), लखन बाळासाहेब माने (रा. उचगाव), संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई (रा. उचगाव), लाला शेठ व इतर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(२), १४०(३), १३८, ३३३, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.