Header Ads

धक्कादायक! एमएसईबीच्या विद्युत तारा चोरणारी टोळी जेरबंद; ५ गुन्ह्यांची उकल, ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 धक्कादायक! एमएसईबीच्या विद्युत तारा चोरणारी टोळी जेरबंद; ५ गुन्ह्यांची उकल, ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिनिधी – अमर इंदलकर | सातारा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सातारा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून एमएसईबीच्या विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या तारा चोरून वीज यंत्रणेलाच लक्ष्य करणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणत तब्बल ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

घटनास्थळांची पाहणी, गोपनीय माहिती आणि सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सुरेश बबन जाधव (वय २३), दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय २६), आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (वय ३३) या खटाव तालुक्यातील आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत पाच ठिकाणी एमएसईबीच्या विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी १,२०८ किलो वजनाच्या अॅल्युमिनियमच्या तारा (किंमत ५,४३,६०० रुपये) तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा मॅक्स पिकअप (MH-16-AY-9665, किंमत ६ लाख रुपये) असा एकूण ११,४३,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२६, ४९/२०२६, ६१/२०२६, ७५/२०२६ आणि ११७/२०२६ हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणेला लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.