कागलच्या आठवडी बाजारात कांद्याचा व लिंबूचा दर वाढला ; कांदा, लिंबू, बटाटा महाग तर कोथिंबीर, टोमॅटो स्वस्त!
कागलच्या आठवडी बाजारात कांद्याचा व लिंबूचा दर वाढला ; कांदा, लिंबू, बटाटा महाग तर कोथिंबीर, टोमॅटो स्वस्त!
कागल: कागल येथील गैबी चौक येथील सोमवारच्या आठवडी बाजारात भाज्यांच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचे घटक असलेले कांदा, लिंबू आणि बटाटा यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरचीचे दर कमालीचे घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महागाईने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असून
बाजारात आवक घटल्यामुळे कांद्याने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. बाजारात कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात असून, चांगल्या प्रतीच्या मोठ्या कांद्याचा भाव तब्बल ८० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तसेच आवक कमी झाल्याने लिंबूही कमालीचे महागले आहेत; मोठे लिंबू १० रुपयांना दोन तर लहान लिंबू १० रुपयांना तीन या दराने विकले जात आहेत. बटाट्याच्या भावातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून तो २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे.
कोथिंबीर, टोमॅटो, मिरचीची विक्री स्वस्त दरात
काही दिवसांपूर्वी तब्बल ४० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची पेंडी आवक वाढल्यामुळे थेट ५ रुपयांवर आली आहे. टोमॅटो आणि मिरचीचे दरही प्रचंड घसरले असून बाजारात १० रुपयांना ठिग म्हणजे वाटा या स्वरूपात त्यांची विक्री सुरू होती.

No comments: