Header Ads

तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची जोरदार धडक; ६ वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

 तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची जोरदार धडक; ६ वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

पत्नी गंभीर जखमी; जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर, चिंचणी-वासुंबे परिसरात शोककळा.

--------------------------------------------

मिरज-कुपवाड | प्रतिनिधी : राजू कदम.

----------------------------------------------

तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी व सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचे पुत्र सागर जाधव (वय अंदाजे ४० वर्षे) हे दुचाकी क्रमांक MH 10 CF 3864 वरून त्यांची सहा वर्षांची मुलगी हर्षिता हिला घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका शाळेत पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते.

शाळेतून पत्नीला सोबत घेऊन तिघेही दुचाकीवरून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहन क्रमांक MH 09 CA 9478 ला दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेत सागर जाधव आणि त्यांची अवघी सहा वर्षांची मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सोनाली जाधव गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण, सोनाली जाधव यांची प्रकृती आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबतची अधिकृत माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळणे बाकी आहे.

एकाच घरातील दोन जीव गेले...

वडील आणि अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची बातमी समजताच चिंचणी, वासुंबे आणि तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

No comments:

Powered by Blogger.