ओतूर पोलिसांचे माणुसकी दर्शन; बस स्थानकावर दोन महिन्यांपासून एकट्या असलेल्या ७५ वर्षीय आजीची सुखरूप कुटुंबाशी भेट.
ओतूर पोलिसांचे माणुसकी दर्शन; बस स्थानकावर दोन महिन्यांपासून एकट्या असलेल्या ७५ वर्षीय आजीची सुखरूप कुटुंबाशी भेट.
कैलास बोडके.
-------------------------------
आळेफाटा (प्रतिनिधी )घरातून कोणालाही न सांगता निघून आलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेला ओतूर(ता. जुन्नर )पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुखरूप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली. या घटनेमुळे ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केशरबाई त्र्यंबक काळे वय ७५, रा. धनेगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे या महिलेचे नाव आहे. त्या गेल्या दोन महिन्यांपासून ओतूर बस स्थानक येथे एकट्याच बेवारस अवस्थेत थांबल्या असल्याची माहिती सखाराम मिलखे यांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी मयुरी खोसे यांना दिल्या नंतर ओतूर पोलिसांनी तातडीने बस स्थानकावर जाऊन त्यांची चौकशी केली असता, त्या कोणालाही न सांगता जामखेड येथून निघून आल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन संपर्क साधला. मात्र नातेवाईकांनी येण्याची तात्काळ सोय नसल्याचे सांगितले. त्यामुळे या आजीच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी त्यांना पांगरी माता येथील राजाराम पाटील आश्रम शाळेत दोन ते तीन दिवस सुरक्षित ठेवले.अखेर दि. १३ सप्टेंबर रोजी त्यांचे पती त्र्यंबक लक्ष्मण काळे हे ओतूर पोलीस स्टेशन येथे आले. पोलिसांनी खातरजमा करून केशरबाई यांना त्यांच्या पतीच्या ताब्यात सुखरूप दिले. यावेळी आजी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments: