Header Ads

पन्नास वर्षांची समाजजागृतीची मशाल.कौलवच्या युनियन तरुण मंडळाची प्रेरणादायी यशस्वी परंपरा.कौलवच्या युनियन तरुण मंडळाने गणेशोत्सवाला दिले विधायकतेचे अधिष्ठान

पन्नास वर्षांची समाजजागृतीची मशाल.कौलवच्या युनियन तरुण मंडळाची प्रेरणादायी यशस्वी परंपरा.कौलवच्या युनियन तरुण मंडळाने गणेशोत्सवाला दिले विधायकतेचे अधिष्ठान.

-----------------------

संदिप कलिकते.

-----------------------

राधानगरी:- गाव बदलते ते केवळ रस्ते, इमारती आणि सुखसोयी वाढल्याने नव्हे,तर माणसांच्या विचारांत परिवर्तन घडते तेव्हा गाव खऱ्या अर्थाने पुढे जाते. सामाजिक सलोखा, समता, शिक्षण, युवकांचे संघटन आणि समाजोपयोगी उपक्रम यांची सांगड घालत एखादी संस्था तब्बल अर्धशतक अविरत कार्यरत राहते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. कौलव (ता. राधानगरी) येथील युनियन तरुण मंडळ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

आज मंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिले तर या वाटचालीत केवळ गणेशोत्सव नाही, तर सामाजिक परिवर्तनाची एक प्रदीर्घ चळवळ दिसून येते. विविध जाती,जमातींच्या युवकांना एका व्यासपीठावर आणत गावाच्या सामाजिक जीवनाला नवी दिशा देण्याचे काम या मंडळाने केले आहे.

गट,तटांच्या सावटाखालील कौलव.

काही दशकांपूर्वीचे कौलव आजच्या कौलवपेक्षा निश्चितच वेगळे होते. राजकीय गट तटांचे वातावरण गावाच्या सामाजिक जीवनावर प्रभाव टाकत होते. आपल्या गटातील माणूस आपला आणि दुसऱ्या गटातील माणूस परका  अशी मानसिकता समाजमनात रुजली होती.

गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होती. बागायती क्षेत्रात ऊस, तर जिरायती भागात भात, नाचणी, भुईमूग यांसारखी पिके घेतली जात. पारंपरिक बलुतेदारी व्यवस्थेचा प्रभावही मोठा होता. उत्पन्नाची साधने मर्यादित असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांचे प्रमाण कमी होते. आधुनिक विचारांचा आणि नव्या सांस्कृतिक प्रवाहांचा गावात फारसा प्रभाव नव्हता.

बेंदूर, गुढीपाडवा, घरगुती गणेशोत्सव आणि सौंदलगा यात्रा यांसारखे पारंपरिक सण उत्साहात साजरे होत. मात्र सार्वजनिक स्वरूपातील मोठे सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम तुलनेने कमी होते.

एक गाव, एक पाणवठा चा ऐतिहासिक लढा

याच काळात गावातील काही जुन्या आणि सामाजिक विषमता वाढविणाऱ्या रूढी,परंपरांना छेद देण्याचे धाडस काही युवकांनी दाखविले.

दलित समाजातील नागरिकांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास असलेली बंदी ही त्यापैकीच एक अन्यायकारक प्रथा होती. या प्रथेविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस कुंभार गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते *अरुण सोनाळकर* यांनी केले. त्यांच्या सोबतीला *सदाशिव लोहार, महादेव पाटील, अशोक पाटोळे* यांच्यासह अनेक तरुण उभे राहिले.

युवकांनी एक गाव, एक पाणवठा ही भूमिका घेत सामाजिक समतेचा लढा उभारला. हा लढा केवळ पाणवठ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यातून गावाच्या सामाजिक मानसिकतेत परिवर्तनाची सुरुवात झाली. चुकीच्या रूढी,परंपरांना प्रश्न विचारण्याची आणि सामाजिक समतेला स्वीकारण्याची नवी जाणीव निर्माण झाली.

हीच युवकांची एकजूट पुढे संघटित रूप घेऊ लागली आणि २६ जानेवारी १९७६ रोजी कौलवमध्ये युनियन तरुण मंडळाची स्थापना झाली.*युनियन मंडळाची स्थापना अरुण सोनाळकर यांच्या नेतृत्वखाली झाली*.

विविध समाजघटकांना जोडणारे युनियन

युनियन या नावातच या मंडळाची भूमिका दडलेली आहे. कुंभार, लोहार, सुतार, मराठा, मातंग, दलित अशा विविध समाजघटकांतील युवक एका व्यासपीठावर आले. जात, गट, तट यापलीकडे जाऊन युवक हीच आपली ओळख या भावनेने मंडळाची वाटचाल सुरू झाली.

गणेशोत्सव हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरले. केवळ मनोरंजन आणि धार्मिक विधी यापुरता गणेशोत्सव मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक प्रबोधन, एकोपा आणि विधायक कार्याची जोड देण्यात आली.

गणेशोत्सवातून समाजकार्याची नवी परंपरा

युनियन तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाला कौलवमध्ये विशेष स्थान निर्माण झाले. आकर्षक व भव्य गणेशमूर्ती, देखणा मंडप, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्तबद्ध नियोजन यामुळे मंडळाचा गणेशोत्सव गावाच्या सांस्कृतिक जीवनातील आकर्षण ठरला.

मात्र या भव्यतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव हे मंडळाचे खरे वैशिष्ट्य राहिले. गेल्या पन्नास वर्षांत गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.

विशेष म्हणजे गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन प्रदूषणविरहित पद्धतीने करण्याची परंपराही मंडळाने सातत्याने जोपासली आहे. उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचे भान ठेवण्याचा संदेश यातून दिला जातो.

उत्सवातून समाजसेवा हे ब्रीद

युनियन तरुण मंडळाने उत्सवाला समाजकार्याची जोड दिली. कष्टकरी आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू रुग्णांना दवाखाना उपचारासाठी मदत, रक्तदान शिबिरे,लेझीम प्रात्यक्षिके,सांस्कृतिक कार्यक्रम , वृक्षारोपण यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.

गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक, नोकरी,व्यवसाय,उद्योगात प्रगती करणाऱ्या व्यक्ती यांना प्रोत्साहन देण्याचे कामही मंडळाने केले. आपल्या गावातील एखादा युवक पुढे गेला तर त्याच्यामागे गावाची शक्ती उभी राहिली पाहिजे, हा विचार मंडळाने कृतीत उतरविला.

यातूनच शिक्षण आणि रोजगाराच्या संधींकडे पाहण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत गेला. गावातील नव्या पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली.

पहिली पिढी वार्धक्यात, नवी पिढी मशाल घेऊन सज्ज

युनियन तरुण मंडळाची स्थापना करणारे अनेक कार्यकर्ते आज वयोमानाने वार्धक्याकडे गेले आहेत. मात्र त्यांनी पेटविलेली सामाजिक परिवर्तनाची मशाल विझलेली नाही. उलट आजची जेन झी पिढी ती अधिक जोमाने पुढे घेऊन जात आहे.

आजच्या युवकांसमोर मोबाईल, सोशल मीडिया, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली अशी अनेक आव्हाने आहेत. तरीही आपल्या गावाशी, आपल्या संस्कृतीशी आणि सामाजिक बांधिलकीशी नाते जोडून ठेवण्याचे काम युनियन मंडळाची नवी पिढी करीत आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.

पन्नास वर्षांचा प्रवास म्हणजे केवळ कालावधी नव्हे.

पन्नास वर्षे ही कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी मोठी तपश्चर्या असते. अनेक मंडळे उत्साहाने सुरू होतात.काही वर्षांतच त्यांचा उत्साह ओसरतो. मात्र युनियन तरुण मंडळाने *पाच दशकांचा सातत्यपूर्ण प्रवास करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे*.

या प्रवासात उत्सवाचे स्वरूप बदलले, गाव बदलले, शेतीचे स्वरूप बदलले, युवकांच्या आकांक्षा बदलल्या आणि तंत्रज्ञानाने जीवन बदलले. पण समाजासाठी काहीतरी करण्याची मंडळाची भूमिका बदलली नाही.

हीच या मंडळाची खरी ताकद आहे.

कौलवच्या सामाजिक इतिहासातील मानाचे पान

कौलवच्या सामाजिक इतिहासाचा विचार केला तर युनियन तरुण मंडळाचे योगदान केवळ एका गणेशोत्सव मंडळापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठविण्यापासून ते विविध समाजघटकांतील युवकांना एकत्र आणण्यापर्यंत, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यापासून गरजूंना मदतीचा हात देण्यापर्यंत आणि पर्यावरण संवर्धनापासून रक्तदानासारख्या राष्ट्रीय कार्यापर्यंत मंडळाने आपली भूमिका बजावली आहे.

गणेशोत्सव हा निमित्तमात्र; समाजजागृती हे खरे ध्येय, अशी या मंडळाची पन्नास वर्षांची वाटचाल म्हणावी लागेल.

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी वारसा

आज युनियन तरुण मंडळाकडे पाहताना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते.संघटित युवकशक्ती योग्य दिशेने वापरली तर गावाचे सामाजिक चित्र बदलू शकते.

पन्नास वर्षांपूर्वी काही युवकांनी अन्यायकारक प्रथांविरुद्ध उभे राहून परिवर्तनाची सुरुवात केली. आज त्याच विचारांचा वारसा पुढील पिढी उत्साहाने पुढे नेत आहे. ही परंपरा केवळ कौलवपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.

युनियन तरुण मंडळाच्या संस्थापक कार्यकर्त्यांना, आजवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. कारण त्यांनी कौलवला केवळ भव्य गणेशोत्सवाची ओळख दिली .  युवकांनी समाजासाठी काय करावे, याचा आदर्शही घालून दिला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी प्रज्वलित झालेली ही समाजसेवेची ज्योत यापुढेही अधिक तेजाने प्रज्वलित राहो, नव्या पिढीच्या हातून नवे विधायक उपक्रम घडोत आणि कौलवच्या सामाजिक विकासाचा आलेख असाच उंचावत राहो, हीच युनियन तरुण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

 कुंभार गल्लीतील सर्व युवक ,मध्यम वयीन मंडळी सुद्धा समाविष्ट आहेत.या मंडळाच्या उभारणी पासून आत्तापर्यंत अनेक मंडळींचा सहभाग आहे त्यांची नावे उल्लेख करता आला नाही तरी या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.




💐💐💐💐💐💐

No comments:

Powered by Blogger.