Header Ads

अमरावतीत संतापजनक प्रकार! अल्पवयीन मातेच्या नवजात बाळाचा ३.५० लाखांत सौदा .

 अमरावतीत संतापजनक प्रकार! अल्पवयीन मातेच्या नवजात बाळाचा ३.५० लाखांत सौदा केल्याचा आरोप; महिला डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

अनाथालयात देण्याच्या नावाखाली दिशाभूल केल्याची तक्रार; नवजात बाळ आईजवळ सुरक्षित, फ्रेजरपुरा पोलिसांचा तपास सुरू.


अमरावती | पी. एन. देशमुख, प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीची प्रसूती, त्यानंतर नवजात बाळाच्या कथित विक्रीचा प्रयत्न आणि या प्रकरणात महिला डॉक्टरचे नाव समोर आल्याने अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नवजात बालकाचा ३ लाख ५० हजार रुपयांत सौदा करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप असून, याप्रकरणी महिला डॉक्टर, त्यांचे पती आणि एका १७ वर्षीय मुलाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १७ वर्षे ४ महिने वयाची मुलगी एका १७ वर्षीय मुलाच्या संपर्कातून गर्भवती राहिली. उपचारासाठी तिला महिला डॉक्टर वैशाली भोजने यांच्याकडे नेण्यात आले. तपासणीत पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे समोर आले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी मुलीने नवजात बाळाला जन्म दिला.

मात्र, प्रसूतीनंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्याचा आरोप आहे. महिला डॉक्टर आणि त्यांच्या पतीने मुलीच्या वडिलांना बोलावून नवजात बाळ ३ लाख ५० हजार रुपयांना विकण्याचा कट रचल्याचे तक्रारीत नमूद आहे. बाळाला अनाथालय किंवा दत्तक संस्थेकडे देण्याच्या नावाखाली कुटुंबीयांची दिशाभूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

संशय आल्याने कुटुंबीयांचा निर्णय

बाळाच्या विक्रीचा संशय आल्याने पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांनी प्रसंगावधान राखले. शनिवारी त्यांनी नवजात बाळाला ताब्यात घेत दवाखान्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या बाळ आईजवळ सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डॉक्टरसह तिघांवर गंभीर गुन्हे

या प्रकरणी बलात्कार, पोक्सो कायदा, गुन्हेगारी धमकी आणि मानवी तस्करीसंदर्भातील गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कथित व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, बाळाच्या विक्रीसाठी कोणाशी संपर्क साधण्यात आला होता का आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याचा तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.

ठाणेदार रविंद्र राजुलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीच्या असुरक्षिततेचा आणि नवजात बाळाच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील

नैतिकता आणि बालकांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, बाळाच्या विक्रीसंदर्भातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.