आई - वडिलांच्या भेटीसाठी कॅनडाहून कोल्हापूर - 20 देश, 50 दिवस आणि एका कोल्हापूरकराची जिद्द!
आई - वडिलांच्या भेटीसाठी कॅनडाहून कोल्हापूर
- 20 देश, 50 दिवस आणि एका कोल्हापूरकराची जिद्द!
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- कोल्हापूरचे असणारे गौरव मुडेकर यांचे मुळ गाव पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी मुडेकरवाडी. सध्या ते कॅनडामध्ये (टोरंटो) मध्ये स्थायिक झालेले आहेत. गौरव मुडेकर यांनी एक आगळा-वेगळा संकल्प केला आहे. आपल्या स्वतःच्या चारचाकी गाडीतून आई वडील व बहिणीच्या भेटीसाठी कॅनडा ते कोल्हापूर असा तब्बल 25 हजार किलोमीटरचा प्रवास ते करत आहेत.
गेली 9 वर्षे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या गौरव मुडेकर यांनी या स्वप्नपूर्तीसाठी गेली दोन वर्षे तयारी केली. प्रत्येक देशाचे नियम, व्हिसा, गाडीचा विमा, परमिट आणि आंतरराष्ट्रीय कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली आहे.
त्यांच्या या प्रवासाला 4 सप्टेंबर रोजी टोरंटो येथून सुरुवात झाली आहे. हा प्रवास अमेरिका, युरोप, युके, जर्मनी, तुर्की, इराण, युएई मार्गे भारतात येणार आहे. काही ठिकाणी समुद्रामार्गे जहाजातून गाडी पाठवावी लागणार आहे. या संपूर्ण प्रवासात ते 20 हून अधिक देश पार करणार असून 50 दिवसांनंतर म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत.
गौरव मुडेकर यांचे वडील श्री बाजीराव मुडेकर (बी.आर. )हे एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर असून ,आई प्रा. तेजस्विनी बाजीराव मुडेकर या कमला कॉलेजमध्ये प्राचार्या आहेत.
या प्रवासाबाबत गौरव मुडेकर म्हणाले, "माझं स्वप्न गाडीत बसून कोल्हापूर गाठण्याचं होतं. नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळून हे स्वप्न पूर्ण करतोय. स्वप्न मोठं असेल तर कोणतीही सीमा अडवू शकत नाही."
सोशल मीडियावर त्यांनी या प्रवासाचे व्हिडीओ पोस्ट केले असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
लहानपणी आपल्या वडिलांनी आपल्याला गाडीत बसवुन कोल्हापूर फिरवले आहे. आता आपल्या फोर्ड मस्टॅग या जगातील काही लोकांकडेच असणाऱ्या गाडीतून त्यांना कोल्हापूर फिरवण्याची त्याची इच्छा आहे. कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

No comments: