घोटवडे येथे गंजलेला लोखंडी टॉवर कोसळून घरांचे ५ लाखांचे नुकसान; जीवितहानी टळली.
घोटवडे येथे गंजलेला लोखंडी टॉवर कोसळून घरांचे ५ लाखांचे नुकसान; जीवितहानी टळली.
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे शुक्रवारी रात्री अतिवृष्टीदरम्यान आरबीएल बँकेच्या इंटरनेट कनेक्शनचा गंजलेला लोखंडी टॉवर थेट राहत्या घरावर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कै. भाऊ कृष्णा पाटील आणि प्रवीण नानासो पाटील यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यासह सुमारे ५ लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मुसळधार पावसात हा गंजलेला टॉवर अचानक कोसळला. टॉवरची अवस्था अत्यंत बिकट आणि गंजलेली असतानाही बँकेने याच्या देखभाल-दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वेळीच दुरुस्ती केली असती, तर हा अपघात टाळता आला असता, असा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेमुळे पाटील कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि संबंधित बँकेकडून पीडित कुटुंबांना त्वरित योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

No comments: