सांगली LCB चा दणका! कमरेला पिस्टल, खिशात जिवंत काडतूस; रेकॉर्डवरील आरोपी जाळ्यात! ईश्वरपूरमध्ये अवैध अग्निशस्त्र जप्त; ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत..
सांगली LCB चा दणका! कमरेला पिस्टल, खिशात जिवंत काडतूस; रेकॉर्डवरील आरोपी जाळ्यात!
ईश्वरपूरमध्ये अवैध अग्निशस्त्र जप्त; ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत..
ईश्वरपूर | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
राजू कदम.
सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली. ईश्वरपूर येथे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या अबुबकर हारुणरशीद मणेर (वय २६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१८ ऑक्टोबर रोजी रात्री बंद पडलेल्या जलतरण तलावासमोर एक संशयित इसम पिस्टल घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल (८० हजार रुपये) आणि एक जिवंत काडतूस (१ हजार रुपये) आढळले.
पिस्टल बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपी रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही आर्म्स ॲक्ट आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने केली. पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत.

No comments: