आंबोली : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा..
आंबोली : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा..
आळेफाटा (प्रतिनिधी )|न्यू इंग्लिश स्कूल, आंबोली(ता.जुन्नर )येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात आली, तसेच ग्रामस्थांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. त्यानंतर संविधान वाचन, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, व्याख्यान, प्रश्नमंजुषा, गीत, पोवाडा आणि विद्यार्थ्यांची मनोगते असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या शासनव्यवस्थेसाठी संविधानाची आवश्यकता निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा समितीने संविधान तयार केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमात ह.भ.प. रितेश महाराज नवले यांनी आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संस्कारमूल्ये यांची सांगड घालत संविधानाची ओळख करून दिली. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती भांगे यांनी प्रश्नमंजुषा घेऊन संविधानातील विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविले. बाबासाहेब जाधव यांनी संविधानातील विविध प्रकरणांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना नागरिकांची कर्तव्ये समजावून सांगितली.
शिक्षक व्यंकट मुंडे यांनी विविध स्पर्धांचे आयोजन करून परीक्षण केले व विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ यांनी या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सविधान दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी तसेच क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या विचारांची जाणीव निर्माण झाली.
अशा प्रकारे न्यू इंग्लिश स्कूल, आंबोली येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments: