Header Ads

४० डॉक्टरांची नियुक्ती, ३५ जण रुजूच नाहीत! गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

 ४० डॉक्टरांची नियुक्ती, ३५ जण रुजूच नाहीत! गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वातील जिल्ह्यातच डॉक्टरांची वानवा; आदिवासी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, हिवाळी अधिवेशनात आरोग्य विभागाची कोंडी होण्याची शक्यता!

नागपूर | चक्रधर मेश्राम

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत जिल्ह्यासाठी ४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली; मात्र त्यापैकी केवळ पाच डॉक्टर रुजू झाल्याची माहिती असून, तब्बल ३५ डॉक्टर अद्याप सेवेत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळणार कधी, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत. गर्भवती महिला, बालके आणि गंभीर रुग्णांना उपचारासाठी दूरवर जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व, तर गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. तरीही आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कारभाराबाबतही विविध तक्रारी आणि आरोप पुढे आले आहेत. औषध घोटाळा, माता-बाल मृत्यू, कुपोषण, कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे मुद्दे आगामी हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

नियुक्ती आदेश काढून उपयोग काय, डॉक्टर प्रत्यक्ष रुग्णसेवेत रुजू होणार कधी? मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वातील जिल्ह्यातच आदिवासी जनतेला डॉक्टरांविना आरोग्यसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर या परिस्थितीला जबाबदार कोण? आता सरकार आणि आरोग्य प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस कृती करण्याची गरज आहे.

No comments:

Powered by Blogger.