Header Ads

दत्तवाडमध्ये घरफोडी : सोन्या चांदीचे दागिने लंपास!

 दत्तवाडमध्ये घरफोडी : सोन्या चांदीचे दागिने लंपास! ८ लाख ३५ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

दत्तवाड - प्रतिनिधी (श्री अर्जुन धोंडीराम धुमाळे)

दत्तवाड येथील दानवाड रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल ८ लाख ३५ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे दत्तवाड परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस फिर्यादीतील माहितीनुसार, फिर्यादी यांचे राहते घर ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या लाकडी दरवाजाला लावलेले कुलूप उचकडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील खोलीमधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून लॉकमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या मंगळसूत्रांसह नेकलेस, सोन्याचा नेकलेस सेट, सोन्याचे गोल पदक, तसेच चांदीचे दागिने व वस्तूंचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ३५ हजार १२८ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.


बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर?

दत्तवाड परिसरात बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, तसेच परिसरातील संशयास्पद हालचालींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.