Header Ads

खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करीप्रकरणी वन विभागाला मोठे यश!करंजफेण येथे पाच आरोपी रंगेहात जेरबंद...पाच किलो मुद्देमाल जप्त, न्यायालयाकडून तीन दिवसांची वनकोठडी....

 खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करीप्रकरणी वन विभागाला मोठे यश!करंजफेण येथे पाच आरोपी रंगेहात जेरबंद...पाच किलो मुद्देमाल जप्त, न्यायालयाकडून तीन दिवसांची वनकोठडी....

माधुरी मस्कर - पन्हाळा 

खवले मांजराच्या खवल्यांची अवैध विक्री आणि तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे पाच किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. वन्यजीव तस्करीच्या या प्रकरणाचा तपास करताना वन विभागाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

पेंडाखळे वनपरिक्षेत्राला २१ नोव्हेंबर रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा) कोल्हापूर, फिरते पथक, करवीर, पन्हाळा आणि पेंडाखळे वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या सापळा रचला. करंजफेण येथे खवल्यांची विक्री करत असताना पाच संशयितांना सुमारे पाच किलो मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

यामध्ये लहु धाकू हडकर (वय ६०, रा. सावडाव डोंगरेवाडी, ता. कणकवली), ज्ञानदेव सत्तू सावरे (वय ४६, रा. घुंगूर), प्रकाश शंकर पाटील (वय ५०, रा. पाल), बाजीराव बंडोपंत माळवे (वय ३८, रा. मरळे) आणि नाथाजी यशवंत पाटील (वय ३९, रा. पाल, ता. शाहूवाडी) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पेंडाखळे वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांनी वन्यजीव गुन्हा क्रमांक डब्ल्यूएल ०२/२०२६ अन्वये २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींना चौकशीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कळे-खेरिवडे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. या तस्करीच्या मागे आणखी कोणाचे जाळे आहे का, यासह गुन्ह्याच्या इतर बाबींचा वन विभागाकडून तपास सुरू आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक प्रियांका दळवी, मानद वन्यजीव रक्षक यशपाल सुतार, फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, करवीरचे नंदकुमार नलवडे, पन्हाळ्याचे अजित माळी आणि पेंडाखळेचे किशोर आहेर यांच्यासह विविध वनपाल, वनरक्षक, वनमजूर, आरआरटी पथक व कर्मचाऱ्यांनी केली.


चौकट : 

       वन्यप्राण्यांची अवैध शिकार, वन्यजीव तस्करी अथवा वनवणव्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाला किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पेंडाखळेचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. एस. आहेर यांनी केले आहे.

सोबत फोटो : 

करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे

खवले मांजराच्या खवल्यांची अवैध विक्री आणि तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांसह वन विभागाचे अधिकारी व विविध वनपाल, वनरक्षक, वनमजूर, आरआरटी पथक व कर्मचारी .

No comments:

Powered by Blogger.