Header Ads

कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातील २१ लोखंडी बरग्यांची चोरी उघड! कुरुंदवाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातील २१ लोखंडी बरग्यांची चोरी उघड! कुरुंदवाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा छडा; एकाला अटक, दुसरा फरार – पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक!


कुरुंदवाड | प्रतिनिधी. अर्जुन धुमाळे

कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २१ लोखंडी बरगे चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा कुरुंदवाड पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेले २१ लोखंडी बरगे आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप मॅक्स गाडी असा एकूण ६ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत आहे.


नेमकी घटना काय?

राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याच्या एकूण ६५ गाळ्यांमध्ये बसविण्यात आलेल्या लोखंडी बरग्यांपैकी २१ बरगे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजण्यापूर्वी ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दादासो आनंदा पुजारी यांच्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीने आरोपीचा पर्दाफाश!

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अंमलदार अविनाश भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत महिंद्रा पिकअप मॅक्स गाडीतून लोखंडी बरगे वाहून नेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित वाहनाचा शोध घेतला. हे वाहन कोथळी येथील अनिल आकाराम पुजारी याच्या मालकीचे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी अनिल पुजारी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार अमोल गुंडू नंदीवाले याच्यासोबत राजापूर बंधाऱ्यातील २१ लोखंडी बरगे चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने लपवून ठेवलेले सर्व २१ बरगे पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आले. चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप मॅक्स (क्रमांक MH-10-DT-5039) ही गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली.

एक आरोपी अटकेत, दुसऱ्याचा शोध सुरू!

या प्रकरणात अनिल आकाराम पुजारी (वय २७, रा. मंगेश्वरनगर, कोथळी, ता. शिरोळ) याला २३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अमोल गुंडू नंदीवाले हा फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, निलेश भोसले, अविनाश भोसले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार आणि सागर माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.