Header Ads

डॉ. संयुक्ता निमजे यांच्या सेवासमाप्तीवरून वादंग! जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

 डॉ. संयुक्ता निमजे यांच्या सेवासमाप्तीवरून वादंग! जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

नोटीस न बजावताच सेवामुक्त केल्याचा आरोप; अन्यायाविरोधात उच्च न्यायालयात धाव, न्यायालयाकडून प्रतिवादींना नोटीस


नागपूर | चक्रधर मेश्राम | दि. २७ नोव्हेंबर २०२६

गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरोंडी येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. संयुक्ता प्रभाकर निमजे यांना सेवेतून मुक्त करण्याच्या निर्णयावरून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न बजावता तसेच न्यायालयीन आदेश आणि विनंती अर्जाचा विचार न करता सेवामुक्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डॉ. निमजे यांना २४ सप्टेंबर २०२६ रोजी सेवामुक्त करण्यात आले. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या अन्यायाविरोधात डॉ. निमजे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने राज्य शासन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यासह प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गडचिरोलीतील दुर्गम व आदिवासी भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असताना डॉ. निमजे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

एका बाजूला आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कारवाई आणि दुसऱ्या बाजूला दुर्गम भागातील आरोग्य सेवेचे प्रश्न; जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कारभाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Powered by Blogger.