हेरवाडमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर LCB ची धडक कारवाई; १२ जणांना ऐन खेळात पकडले, १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
हेरवाडमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर LCB ची धडक कारवाई; १२ जणांना ऐन खेळात पकडले, १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने शुक्रवारी संध्याकाळी भन्नाट धडक कारवाई करून १२ जणांना ऐन पत्याच्या खेळात गजाआड केले. या कारवाईत तब्बल १ लाख २२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून गावात या धाडीने एकच खळबळ उडाली आहे.गुप्त बातमी आणि सापळाअवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सखोल तपास व कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांच्या पथकाला कार्यसूचना दिल्या. अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, रेणुका मंदिराजवळील गावठाण परिसरात रमी नावाचा पत्याचा जुगार सुरू आहे. त्यावर विश्वासू बातमीदारांच्या माध्यमातून माहिती निश्चित केल्यानंतर पथकाने सापळा आखला.छापा आणि पकडलेले खेळाडूदि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली रेणुका मंदिराजवळील कुमार बाळगोंडा पाटील यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी घरात घुसताच खेळ सुरू होता; पत्यांचे संच, मोबाईलचे स्क्रीन झळकत होते आणि नोटांच्या गड्ड्या मोजल्या जात होत्या. तत्काळ सर्वांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्यांमध्ये अर्जुन लग्मान्ना पुजारी (४५), प्रकाश गजानन गवंडी (५२), आप्पा लक्ष्मण धामणे (७३), गौतम विजय शिंगे (२९), मुरारी आण्णासो नरवाडे (४०), राजकुमार पाटील (३५), तानाजी कुहुरे (५०), सुदाम जाधव (७६), धनंजय कांबळे (५३), दत्ता शिरगन्नावर (३७), नामदेव गायकवाड (५२) आणि संतोष कुचुरे (४४) या सर्वांचा समावेश आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी ९,१९० रुपये रोख रक्कम, १० मोबाईल हँडसेट, ६० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल आणि पत्त्यांचे संच असा एकूण १ लाख २२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस चौकशीत उघड झाले की, हा अड्डा अमित पांडुरंग शिरोळे या इसमाचा असून तो प्रत्येक खेळातून कमीशन घेत होता. त्याने संबंधित घर मालक कुमार पाटील यांच्याकडून भाड्याने घेतले होते. गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे नागरिक सांगत होते, मात्र पोलिसांनी योग्य वेळी धडक कारवाई करत हा अड्डा उद्ध्वस्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना अवैध व्यवसायांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरणाने वागण्याचे आदेश दिले आहेत. “अशा अड्ड्यांना पोलिसांची भीती वाटली पाहिजे,” असे ते म्हणाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या कारवाईत निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संजय कुंभार, सागर माने, महेश पाटील, महेश खोत, विशाल चौगले, प्रविण पाटील आणि सतिश सुर्यवंशी यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली. आरोपींना जप्त मुद्देमालासह कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: