Header Ads

चिखलदरा येथे अजित पवार गटाला मोठा धक्का माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी यांचा पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश.

 

चिखलदरा येथे अजित पवार गटाला मोठा धक्का
माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी यांचा पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश.



दैनिक फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्

 पी. एन. देशमुख, 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती (चिखलदरा-मेलघाट) :
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा-मेलघाट येथील अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील गटाचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे वीस वर्षे नगराध्यक्ष राहिलेले राजेंद्रसिंग सोमवंशी यांनी आपल्या पुत्र अनुप सोमवंशीसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. गुरुवारी (दि. १४) झालेला हा पक्षप्रवेश सोहळा जल्लोषात पार पडला.

या कार्यक्रमाला भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, निवडणूक प्रमुख खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, महामंत्री नितीन गुडधे पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटातील प्रभावी नेता भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे. माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी आणि त्यांचा मुलगा अनुप सोमवंशी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करून भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, महामंत्री नितीन गुडधे पाटील यांनी सोमवंशी पिता-पुत्रांना भाजपचा दुपट्टा परिधान करून पक्षात जाहीर स्वागत केले.

सोमवंशी यांच्या प्रवेशामुळे चिखलदरा येथील भाजपची ताकद लक्षणीय वाढली असल्याचे मानले जात आहे. आगामी चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत राजेंद्रसिंग सोमवंशी हे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार असतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप ऐतिहासिक कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रत्येक समाजघटकाला या निवडणुकीत समान संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, जमिनीवरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे व माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.

No comments:

Powered by Blogger.