📰 वाठारमध्ये गॅरेजला भीषण आग; दोन दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान.
📰 वाठारमध्ये गॅरेजला भीषण आग; दोन दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान.
वाठार (प्रतिनिधी – ) : हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे सीता वाईन्स शेजारी असणाऱ्या गायकवाड बिल्डिंग समोरील बाबा टू व्हीलर गॅरेज व शेजारील राजू जेन्टस पार्लर या दोन दुकानांना भीषण आग लागून दोन्ही दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही दुकान गाळे हे सुरेश यशवंत गायकवाड यांच्या मालकीचे आहेत. यापैकी एका गाळ्यात विजय तुकाराम शिर्के (रा. वाठार) हे बाबा गॅरेज नावाने टू व्हीलर दुरुस्तीचे काम करतात, तर शेजारील गाळा जेन्टस पार्लरसाठी भाड्याने देण्यात आला होता.
आज सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास सुरेश गायकवाड यांनी गाळ्यालगत पडलेला कचरा व ऑईलमध्ये खराब झालेली कापडे एकत्र करून जाळत असताना अचानक आग भडकली. ऑईलच्या कापडामुळे आग वेगाने गॅरेजमध्ये शिरली व काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
या आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली एक दुचाकी, ऑईल कॅन, स्पेअर पार्ट्स व इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच जेन्टस पार्लरमधील फर्निचर व इतर साहित्यही पूर्णतः जळाले असून फक्त पत्रे शिल्लक राहिली आहेत.
घटनेची माहिती मिळताच जनसेवक पत्रकार प्रकाश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. यावेळी विजय शिर्के, अथर्व शिर्के, दत्तात्रय शिर्के, गणेश कुंभार, दादासो दबडे, योगेश दबडे, गणेश क्षीरसागर, दत्ता कांबळे व अतुल देसाई यांनीही तत्पर मदत केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments: