➡️ रमाई आवास घरकुल योजना तात्काळ सुरू करा; रिपब्लिकन सेनेचा इशारा .
➡️ रमाई आवास घरकुल योजना तात्काळ सुरू करा; रिपब्लिकन सेनेचा इशारा.
------------------------कोल्हापूर (दि. ५ फेब्रुवारी २०२६) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची रमाई आवास घरकुल योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांना पक्के घर मिळावे या उद्देशाने शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. वार्षिक उद्दिष्टानुसार अनेक गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र १२ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना बंद करण्यात आल्याने समाजातील पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही योजना तात्काळ पुन्हा सुरू करून अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मा. गजानन गुरव यांनी स्वीकारले. यावेळी रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, महासचिव अर्जुन कांबळे, सचिव संतोष कांबळे, महासचिव अर्जुन गोंधळी, कोषाध्यक्ष दिपक डोणे, कोषाध्यक्ष संदीप गोंधळी तसेच जिल्हा संघटक तानाजी काळे उपस्थित होते.

No comments: