कागल येथे अपघातात हेरलेतील शब्बीर देसाई यांचा मृत्यू
कागल येथे अपघातात हेरलेतील शब्बीर देसाई यांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शशिकांत कुंभार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कागल / हेरले, दि. २५ फेब्रुवारी २०२६
कागल येथील पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओ चेक पोस्ट नाका परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील ४८ वर्षीय शब्बीर हजरत देसाई यांचा भरधाव आयशर टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले मामा महंमद अबुकादर खतीब हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर देसाई हे आपल्या एमएच ०९ डीसी ६७६८ क्रमांकाच्या मोपेडवरून कर्नाटकातील हुकेरी येथे नातेवाईकांच्या निधनप्रसंगी जाण्यासाठी मामा महंमद खतीब यांना घेऊन सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून निघाले होते. दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान ते कागल शहराजवळील आरटीओ चेक पोस्ट नाका ओलांडत असताना बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या केए २५ एबी २७३४ क्रमांकाच्या भरधाव आयशर टेम्पोने डावीकडून जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, शब्बीर देसाई हे टेम्पोच्या चाकाखाली सापडले, तर मागे बसलेले महंमद खतीब रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. या अपघातात शब्बीर देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. महंमद खतीब यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कागल आरटीओ नाका परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनत चालल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. येथे अवजड वाहनांना नागमोडी वळण घेत जावे लागते. त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वारांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारीही याच ठिकाणी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संतप्त वाहनधारकांनी आरटीओ चेक पोस्ट बंद करण्याची मागणी केली.
या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मयत शब्बीर देसाई हे आरोग्य खात्यात कार्यरत होते. ते हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीस होते. मनमिळावू स्वभाव आणि आपुलकीने वागणारे म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांचे २ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या चाळीस दिवसांचा कार्यक्रम पूर्ण होण्यापूर्वीच शब्बीर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने देसाई कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: